Sunday, January 30, 2011

प्रवास 'विचारसरणी'च्या प्रारंभाचा


युरोपमधील पुनरुत्थानाच्या (रेनेसाँ) आणि प्रबोधनाच्या (एनलायटन्मेंट) चळवळीने युरोपातच नव्हे तर मानवी इतिहासात आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. माणूस जन्मत: स्वतंत्र असतो आणि स्वतंत्रता हेच त्याचे सत्त्व आहे. सारी माणसे जन्मत: समान आहेत. माणूस हा प्राय: विचारक्षम (रॅशनल) आणि म्हणूनच विवेकक्षम प्राणी आहे ही प्रबोधनकाळाची मुख्य शिकवण होती. यातूनच स्वातंत्र्य, समता, विवेकवाद या मूल्यांचा उदय झाला. या मूल्यांमुळे माणसाची स्वत:कडे पहाण्याची, निसर्गाकडे आणि समाजाकडे पहाण्याची जीवनदृष्टीच बदलली. ही जीवनदृष्टी सरंजामशाहीकालीन पारंपरिक व मध्ययुगीन जीवनदृष्टीपेक्षा खूपच आगळीवेगळी होती. मध्ययुगीन, पारंपरिक समाजव्यवस्थांमध्ये समता हे मूल्य नव्हते. सारी मानवी नाती ही वरिष्ठ आणि कनिष्ठतेच्या तत्त्वावर आधारित होती. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, गुरु-शिष्य, मालक-नोकर, जमीनदार-भूदास, राजा-प्रजा ही नाती बरोबरीच्या, समानतेच्या तत्त्वावर आधारित नव्हती. ती वरिष्ठांप्रतीच्या नि:सीम निष्ठेवर आधारित होती. काही माणसे जन्माने श्रेष्ठच असतात, जन्मजात गुणसंपन्न असतात आणि त्यांच्या धुरिणत्वाखाली सर्वसामान्यांनी आपले समाजजीवन जगण्यातच सर्वांचेच भले असते अशी पारंपरिक समाजाची धारणा होती. आजही स्वातंत्र्य, समता, बंधुता इ. प्रबोधनकालीन मूल्ये ज्या समाजघटकांपर्यंत पोहोचली नाहीत, अशा मंडळींना 'समता' अस्वाभाविक वाटते. स्वातंत्र्याचे मूल्य निरर्थक वाटते.
प्रबोधनकालीन मूल्यांनी माणसाच्या या पारंपरिक धारणांना छेद दिला. माणूस विचारक्षम असल्याने त्याला त्याचे हित-अहित समजू शकते म्हणूनच त्याला विचाराचे, निर्णयाचे, निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असा आग्रह प्रबोधनकालीन विचारवंतांनी, वैज्ञानिकांनी, तत्त्वचितकांनी धरला. या स्वातंत्र्याच्या आग्रहामुळेच समाजातील धर्मगुरु, राजा, सरंजामी वतनदार, सरदार वर्ग यांच्या निरंकुश सत्तेला हादरे बसले. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स या देशांत लोकसत्ताक क्रांत्या झाल्या. आपली समाजरचना, राजकीय संस्था व व्यवस्था माणूस स्वत:च्या संकल्पानुसार बनवू, घडवू शकतो हा विश्वास माणसात निर्माण झाला. निसर्ग हा नियमबद्ध असून, निसर्गाचे नियम समजू शकतात आणि ते मानवी बुद्धीच्या कक्षेत आहेत हे विज्ञानाने स्पष्ट केले. त्याच न्यायाने सामाजिक जीवनाची गतितत्त्वे, समाजव्यवस्थांची धारक तत्त्वे विचाराच्या सहाय्याने, निरीक्षणातून समजू शकतात याचाही साक्षात्कार माणसाला झाला. साहजिकच सर्व सामाजिक, राजकीय, संस्था या मानवनिर्मित असून, माणसानेच स्वत:च्या हितापोटी त्या निर्माण केल्या आहेत, त्यात बिघाड झाल्यास तो दूर करण्याची क्षमताही माणसात आहे, किबहुना एक विचारक्षम जीवमात्र म्हणून ती त्याची जबाबदारी आहे ही धारणा प्रबोधनाने माणसाच्या ठायी निर्माण केली. हाच तो प्रबोधनकालीन बुद्धिवाद.
हा बुद्धिप्रामाण्यवाद आधारभूत मानून सन १७९५ मध्ये अंतोनी दि त्रेसी या विख्यात विचारवंताने 'इन्स्तित्यूत दि फ्रान्स' ही संस्था विचार शास्त्राचा (सायन्स ऑफ आयडियाज) पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुरू केली व तो त्याचा प्रमुखही बनला. या विचार शास्त्राला दि त्रेसीने 'आयडिऑलाॅजी' असा शब्दप्रयोग वापरला. आयडिऑलाॅजीच्या सहाय्याने माणसाची विचार-प्रक्रिया कशी चालते हे समजू शकेल. मानवी मनात विचार, कल्पना कशा तयार होतात हे समजले तर मानवी वर्तनाचा व कृतीचा नेमका अर्थ समजेल, त्याविषयीचे खरे ज्ञान माणसाला प्राप्त होईल व या ज्ञानाच्या आधारेच माणूस आपल्याला हव्या असलेल्या समाज व्यवस्थांची निर्मिती सहज करू शकेल व त्यातून त्याचे समाजजीवन सुखकर होईल हा प्रबोधनकालीन आशावाद दि स्त्रेसीच्या आयडियालाॅजी च्या मुळाशी होता. नंतरच्या काळात आयडियालाॅजी या शब्दाला अगदीच वेगळा अर्थ प्राप्त झाला हा भाग वेगळा. फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यावर त्याच्या अधिकारशाहीमुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सशक्तपणे निर्माण झालेल्या लोकशाहीच्या धारणा व बुद्धिप्रामाण्यवादास खीळ बसली. नेपोलियनने पद्धतशीरपणे अंतोनी दि त्रेसी व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रतिपादिलेल्या बुद्धिप्रामाण्याचा, विचार शास्त्राचा उपहास केला व अंतिमत: त्यांनी स्थापलेली इन्स्टिट्यूज दि फ्रान्स ही संस्थाही मोडीत काढली.
दि त्रेसीच्या मूळ कल्पनेप्रमाणे, विचार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झालेली आयडियॉलाॅजी प्राणीशास्त्राची ज्ञानशाखा म्हणून विकसित होण्याऐवजी ती राजकीय व्यवस्थेचे धारक तत्त्व आणि विश्वदर्शनाची चौकट म्हणून पुढे विकसित झाली. यातूनच आज ज्याला आपण 'राजकीय विचारप्रणाली' (आयडिऑलाॅजी) म्हणतो त्या राजकीय विचारसरणीचे युग अवतरले. 'राष्ट्रवाद', 'उदारमतवाद', 'व्यक्तिस्वातंत्र्यवाद', 'कॉन्झर्व्हेटिझम', 'समाजवाद', 'भांडवलवाद', 'अराज्यवाद', 'साम्यवाद', 'फॅसिझम' अशा कितीतरी विचारधारा परस्परांशी संघर्ष करीत, ऐकमेकांशी टकराव घेत निर्माण झाल्या व त्यांनी आपली राजकीय दृष्टी व जीवनदृष्टी घडविली.
आपल्याला जाणीव असो वा नसो; पण राजकीय व्यवस्थांचे, राजकारणाचे, समाजातील विविध वर्गांचे आणि घटकांचे आपले आकलन हेच मुळी राजकीय विचारसरणींनी निर्धारित होत असते. झालेले असते. दलित, आदिवासींना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतची नाराजी व्यक्त करताना बरेच जण त्यांना 'सरकारी जावई' असे उपहासाने म्हणतात तेव्हा ते ब्राह्यण्यवादाची विचारसरणी बोलत असतात. हे त्यांना दरवेळेस समजतेच असे नाही. म्हणूनच 'आम्ही जातबित मानत नाही' असे म्हणतानाच व स्पर्शास्पर्शाच्या व्यवहारापुरती जात मुक्त झालेली मंडळी 'लग्ने शक्यतो जातीअंतर्गतच असलेली बरी', किवा 'आरक्षणाचे फारच स्त्रोत माजलंय बुआ' अशी परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसतात. किवा अनेक दलित मंडळी सरसकट सर्व ब्राह्यणांना व उच्च जातींना 'मनुवादी' ठरवतात तेव्हा ते डॉ. आंबेडकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वज्ञानापेक्षा आंबेडकरवादी विचारसरणीच बोलत असतात हेही त्यांना बऱ्याचदा समजत नसते. 'सारे मुसलमान दहशतवादी नसतात पण दहशतवादी असलेले सारे मुसलमानच असतात' असा एस.एम.एस. करणारी मंडळी हिदुत्वावादाचे वाहक असतात.
तात्पर्य काय तर आपली राजकीय मते, दृष्टीकोन, राजकारणाचे आकलन हे सारेच विचारसरणीमुलक (आयडॉलाॅजिकल) असते, इतकी राजकीय विचारसरणी आपल्या कळत न कळत आपल्या विचारांचा व जाणीवांचा ताबा घेत असते. म्हणूनच विविध विचारसरणींचा परिचय करून घेण्याआधी राजकीय विचारसरणी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक विचारसणीची ताकद आणि मर्यादा समजू शकेल. तसेच विचारसरणीचे राजकारणातील व समाजकारणातील महत्त्व समजू शकेल. अन्यथा 'शेंडी राखणारे आणि घंटा वाजवणारे हिदुत्व आम्हाला नकोय' किवा 'आमचे एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' या विधानांचा अर्थबोध होणार नाही. तसेच 'बहुजनवाद ते सर्वजनवाद' हा राजकीय प्रवास समजणार नाही.
- प्रा. डॉ. यशवंत सुमंत
(yashwantsumant06&yahoo.com )

लोकमत मंथन ३० जाने २०११ मधून साभार.

No comments:

Post a Comment