Sunday, October 25, 2015

वंदे मातरम राष्ट्रगीत का नाही?

जगातील सर्व राष्ट्रगीतांचा आढावा घेतला तर राष्ट्रगीताची पद्यरचना आणि राष्ट्रगीताची धून दोन्ही राष्ट्रगीत मानले जाते. म्हणजे परदेशात राष्ट्रगीताची केवळ धून वाजवली जाते, गाणे नव्हे. वंदे मातरम या गीताची चाल द्रुत नसून ती विलंबीत आहे, त्यामुळे वंदे मातरम हे गीत मिलीटरी बँडवर वाजवता येत नाही. वंदे मातरम या गीताच्या मुळ चालीला संगीत देताना त्यात कुठेही ड्रमचा वापर होत नाही. संतुर आणि बासरीचा वापर होऊ शकतो. ड्रम किंवा ट्रम्पेट वापरता येत नसल्यामुळे वंदेमातरम या गीतावर ड्रील करता येत नाही. मग त्याची चाल बदलून टाकावी लागेल, जी बाब वंदे मातरम या गीतात जो मुळ देवीस्तुतीचा भाग आहे त्याला क्षती पोचवणारी आहे. त्याकाळी गीते गाऊन म्हटली जात असत , ज्याला 'तरन्नुम मे गाना' असे म्हणत. बंकीमचंद्र  कवि वा गीतकार नव्हते तर ते कादंबरीकार होते व वंदे मातरम हे गद्यरूप आहे, पुर्ण पद्य नव्हे. याऊलट   रविंद्रनाथ हे केवळ गीतकार नव्हते तर ते  संगीतकारही होते!
'जन गण मन' या गीतास त्यांनी स्वत:  जी चाल बसवली होती ती मिलीटरी ड्रम साठी योग्य ठरली.

भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्ये आणि  मिलटरी ड्रम मधे फरक आहे. ड्रम आणि तबला, दोन्ही चर्मवाद्ये असले तरी फरक आहे. जन गन मन, वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, कदम कदम बढाये जा, झंडा उंचा रहे हमारा इत्यादी गीतांचा आणि त्यांना दिल्या जाणा-या संगीताचाही विचार केला गेला होता. त्यातून 'जन गन मन' निवडले गेले. नेहरूं प्रत्येक गीताचे बोल, त्यांचे संगीत, वाद्ये , गाण्यातून प्रतित होणारा अर्थ याबाबत खूप आग्रही होते. जगातील अनेक ऑर्केस्ट्राशी त्यांनी संपर्क साधला होता. खुप बहरदार संगीत असावे अशी त्यांची इच्छा होती आणि आपले राष्ट्रगीत जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत याबाबत ते खूप आग्रही होते. ही बाब पटेल, सरोजीनीदेवी नायडू यांच्यासोबतच्या  पत्रव्यवहारातून स्पष्ट होते.  राष्ट्रगीताची धून अमेरीकन ऑर्केस्ट्राने सर्वप्रथम तयार केली होती. ज्यामधे ड्रम आणि बँगपायपर चा वाद्याचा वापर केला गेला होता.

संदर्भ.  सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू खंड.1 भाग2

- राज कुलकर्णी



No comments:

Post a Comment