Wednesday, April 25, 2012

जीना आणि फाळणी

काही मंडळींना ’जिना उदारमतवादी, पुरोगामी होते पण गांधींच्या राजकारणामुळे ते जमातवादी झाले’ असा गैरसमज कुरवाळण्यात मोठी धन्यता वाटत असते. जिना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जमातवादीच होते. लखनौ कराराची कलमे पाहिली तर जीनांच्या    राष्ट्रवादाच्या कलमांची कल्पना येते. दोन जमाती समान सार्वभौम आहेत म्हणुन त्यांच्या समान सामुदायिक भागीदारीची राज्यव्यवस्था हवी असे थोडक्यात जीनांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेविषयी म्हणता येईल. कोणतेही कलम तीन चतुर्थांश मुस्लिम सभासदांच्या संमतीविना कायदेमंडळात मंजुर होणार नाही, हे कलम अल्पसंख्याक जमातीची बहुसंख्यांकांबरोबर राज्यकारभारात, सर्वच क्षेत्रांत समान भागीदारी प्रस्थापित करणारे होते. मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतांत मुसलमानांना संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व दिल्यावर हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतात तेथील हिंदूंनाही तसे दिले जाणे आवश्यक होते. पण तसे देण्याची तरतूद लखनौ करारात नव्हती. जीनांच्या तथाकथित उदारमतवादाची आणि भारतीय राष्ट्रवादाशी जुळवून घेण्याच्या तयारीची मजल येथपर्यंतच गेली होती.

हा करार झाल्यानंतर त्याच वर्षीच्या मुस्लिम मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरुन जीनांनी काढलेले उद्गार अर्थपूर्ण आहेत. मुसलमानांना त्यांचा वेगळा खलिफा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण आणि मुस्लिम लीगचे इतर पुढारी भारतीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहोत असाही त्यांनी या भाषणात दावा केला आहे. येथे जीनांच्या कल्पना स्पष्ट होतात. आपण मुसलमानांचे एकमेव नेते व्हावे अशी त्यांची आकांक्षा होती. आपल्याला मुसलमानात गोखल्यांसारखे स्थान प्राप्त व्हावे असे त्यांना वाटत असे. गोखले आणि टिळक यांच्या राजकीय वर्तनावर जीनांनी कधी टिका केलेली नाही.

गांधी नेहरुंवर टिका करतानादेखील गोखल्यांचा मोठेपणा ते दाखवीत नाहीत असे जीना म्हणत. जीनांनी हा फरक करण्याची कारणे स्पष्ट आहेत.

गोखले उदारतेने मुसलमानांना केंद्रात चाळीस टक्के प्रतिनिधीत्व द्यायला तयार झाले होते. टिळक वेगळा मतदारसंघ देत होते, मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतात संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व देत होते आणि मुख्य म्हणजे मुस्लिम लीगशी करार करुन ही संघटना मुसलमानांची प्रतिनिधी आहे आणि पर्यायाने कॉग्रेस ही हिंदूंची प्रतिनिधी आहे असे मान्य करत होते. "तुम्ही माझ्याशी टिळकांप्रमाणे बोलणी का करत नाही? ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणुन माझ्याशी बोलत होते." असे जीनांनी एकदा गांधी-नेहरुंना म्हटलेच होते. गांधीजी आणि नेहरु सर्वच जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत असे म्हणवून घेत होते अशी जिनांची खरी तक्रार होती. कॉंग्रेस हिंदू संघटना आहे, गांधी-नेहरु हिंदू आहेत, हे सगळे जीनांनी म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्याचा अर्थ कॉंग्रेस हिंदू संघटना राहावी आणि गांधी-नेहरुंनी हिंदूंचेच प्रतिनिधीत्व करावे असे जीनांना सुचवायचे होते. ते हिंदूंपुरता विचार करत नाहीत हा जीनांचा त्यांच्यावर राग होता. जीनांची या संदर्भातली जातीयवादाची(communalism) व्याख्या अजब होती. गांधी-नेहरु जातीयवादी विचार करत नाहीत म्हणुन ते जातीयवादी आहेत असे ते म्हणायचे.

हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये कधी जिनांनी मुस्लिमांना दोष दिल्याचे दाखवून द्यावे.

१९३१ साली आपल्याला राजकारणात पाहिजे तसे स्थान आणि महत्व्व मिळत नाही, हे पाहून जिनांनी कायमस्वरुपी इंग्लंडला जायचे ठरविले, तेव्हा त्यांना "मुस्लिम स्टुडंट्स युनियन" ने निरोपादाखल मेजवानी दिली. या प्रसंगी या राष्ट्रवादी मानल्या गेलेल्या नेत्याने जातीय भाषण केले. "भारताचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या स्वधर्मियांच्या भावना निर्लज्जपणे भडकावाण्याशिवाय जिनांनी आपला राजकीय वारसा म्हणुन अधिक काही चांगले मागे ठेवले नाही, ही मोठ्या दु:खाची गोष्ट आहे" असा न्या. छागलांचा अभिप्राय आहे. छागलांनी जिनांना हिंदू मुसलमानांचा एक संयुक्त पक्ष स्थापन करण्याची सूचना केली त्यावर जिना त्यांना म्हणाले, "तुम्ही ध्येयवादी आहात, उलट जी काही साधने उपलब्ध असतील, ती घेवुन मला काम करायचे आहे."  

No comments:

Post a Comment