टिळकांचाच काय, पण सावरकरांपेक्षाही मुसलमानांना गांधींचाच धोका आणि पर्यायाने धाकसुद्धा अधिक असल्याचे ब-याच जीनावादी मुस्लिमांना वाटत होते, असे सांगितले, तर कित्येकांना आश्चर्य वाटेल..पण हे खरे आहे. सावरकर आणि त्यांचे समविचारी गांधींकडे मुस्लिमांचा अनुयय करणारा हिंदूहितविरोधक म्हणुन पाहत असले, तरी पाकिस्तानवादी मुस्लिम त्यांच्याकडे अगदी यांच्या उलट प्रकारे पाहत होते. झेड. ए. सुलेरी नामक जिनांच्या निकटवर्ती अनुयायाचे याबद्दलचे विवेचन प्रातिनिधीक मानायला हरकत नाही. सुलेरी "डॉन" ह्या वृत्तपत्राचे संपादक होते. सुलेरींचे "माय लीडर" हे पुस्तक या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.
सुलेरी आपल्या पुस्तकात जिनांचे गांधीविषयीचे मत उद्धुत करतात - "गांधींना समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि वास्तवाच्या अंतरंगांत खोलवर उतरावे लागेल."
सुलेरींनी अगदी सुरुवातीलाच गांधींबद्दलचे आपले मत स्पष्टपणे प्रकट केले आहे - [b]"एक व्यक्ती-एक मत असा अर्थ असलेल्या लोकशाहीच्या आवरणाखाली गांधी मुसलमानांच्या अस्तित्वावर सखोल प्रहार करण्याच्या निकटतम बिंदूपर्यंत येऊन ठाकले होते."[/b]
’गांधींनी भारतातील मुसलमानांची स्वतंत्र ओळख पुसून टाकून त्यांना गिळंकृत करुन टाकायची वेळ आणली होती; परंतु जिनांनी त्यांना वाचवले.’ असा सुलेरींच्या प्रतिपादनाचा रोख आहे. ’गांधी मुसलमानांचे निर्मुसलमानीकरण (deislamization) करु पाहात होते. ही योजना जवळजवळ सिद्धीसही गेली होती,’ हे सुलेरी उदाहरणानेच सिद्ध करतात.
"ज्याच्या आयुष्यात माणसांच्या वर्गीकरणाच्या मुसलमान किंवा काफीर या दोनच कसोट्या होत्या, अशा बलाढ्य़ पठाणाला खादी आणि गांधी टोपी परिधान करताना आणि अहिंसेच्या संप्रदायाचे जलद गतीने ग्रहण करायला शिकताना पाहायचे. मुसलमानांच्या व्यक्तित्वात आणि स्वभावात असा धक्कादायक बदल पूर्वी कल्पनातीत होता. परंतु तसे प्रत्यक्षात घडले आणि त्याचे श्रेय पूर्णत: गांधींना द्यावे लागते."
जिनांनी गांधींच्या या महासंकटातून इस्लामला वाचवले म्हणून ’गांधी म्हणजे जिनांच्या यशाचे खरे मोजमाप होय’ असे सुलेरी म्हणतात; परंतु प्रारंभीच्या काळात मुसलमान ’गांधी गारुडा’ला इतके भाळले होते की, त्यांनी जिनांच्या इराद्याला जुमानले नाही, तेव्हा निराश होवून जिनांना काही काळ निवृत्त व्हायला लागले, असेही ते निदर्शनास आणून देतात.
सुलेरी ब्रिटीश काळातील मुस्लिमांच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतात. १८५७ च्या बंडात ब्रिटीशांना दुखावल्यामुळे ब्रिटीशांनी मुसलमानांना लक्ष्य केले असा त्यांचा युक्तिवाद आहे. मुस्लिमांचा हा -हास सर सय्यद अहमद खानांनी थोपवला. त्यांच्यामुळे मुस्लिम कॉंग्रेसच्या जाळ्यात सापडू शकले नाहीत. उलट आपल्या स्वतंत्र आणि समांतर अश्या राजकीय अस्तित्वाची जाणीव घेवुन त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली व आपल्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळविण्यात यश मिळविले. त्यांचे हे अस्तित्व कॉंग्रेसला मान्य करावे लागले. याचा पावतीवजा पुरावा म्हणजे सन १९१६ चा टिळक-जीना म्हणजेच कॉंग्रेस-मुस्लिम लीग लखनौ करार !
[b]परंतु मुस्लिमांनी प्रयासाने मिळवलेली ही राजकीय स्वायत्तता गांधींनी धुळीला मिळवली. ही किमया गांधी खिलाफतीच्या माध्यमातून करु शकले! मुस्लिमांच्या खिलाफतीला पाठींबा देवून गांधींनी त्यांना कॉग्रेसकडे नुसते वळवून घेतले, असे नाही, तर त्यांची प्रातिनिधीक राजकीय संस्था मुस्लिम लीग नामशेष करुन टाकली. यात गांधींचा हेतू मुसलमानांचे हिंदूकरण करण्याचा होता. गांधींनी सय्यद अहमदांच्या कामावर बोळा फिरवला.[/b]
गांधींनी ऐक्याचा आणि लोकशाहीचा सापळा लावून त्यात खिलाफतीचे आमिष ठेवले व मुस्लिम त्याला बळी पडू लागले, असा सुलेरींचा अन्वयार्थ आहे. लोकशाहीचा स्वीकार याचा मुस्लिमांसाठी परिणाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदू राज्याचा स्वीकार होय.
गांधींनी खिलाफतीचे निमित्त करुन मुस्लिमांना ब्रिटीशांविरुद्ध लढायची चिथावणी दिली. यात गांधी परस्पर ब्रिटीशांच्या हातून मुस्लिमांचा काटा काढू पाहत होते.
या संदर्भात सुलेरींनी केलेले इतिहासाचे वाचन बाबाराव सावरकरांच्या वाचनाच्या अगदी विरुद्ध होते. "अफगाण आमिराला भारतात पाचारण करुन गांधी ब्रिटीशांऐवजी मुस्लिमांची सत्ता स्थापायला निघालेले जयचंद असल्याचा" बाबारावांचा आणि इतर हिंदूत्वनिष्ठांचा आरोप होता. ही मंडळी गांधींचे जे उद्गार उद्ध्रुत करुन त्यांच्यावर हिंदूद्रोहाचा आरोप करतात, तेच उद्गार सुलेरी उद्ध्रुत करतात; पण त्यावरुन त्यांनी काढलेला निष्कर्ष अगदीच वेगळा आहे. हे उद्गार ४ मे १९२१ च्या ’यंग इंडिया’ मधील आहेत. गांधी लिहितात, "अफगाणिस्तानच्या अमिराने ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध युद्ध पुकारले, तर मी एका अर्थाने त्याला निश्चितच मदत करेन."
"सीमारेषेवरिल कोणत्याही आक्रमणाला थारा मिळणार नाही, इतके ब्रिटीश सैन्य सुसज्ज आहे" हे गांधींनी नुकतेच केलेले विधान उद्ध्रुत करुन सुलेरी सांगतात की, गांधींनी अमिराला दिलेले निमंत्रण हेच खरे नसून मुस्लिमांना दिलेली चिथावणी हीच खरी. अमिरामध्ये भारतावर आक्रमण करण्याचे सामर्थ्य नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते, त्यामुळे यात त्यांच्या मायभूमीला कोणताच धोका पोहोचणार नव्हता.
गांधींनी १८५७ च्या बंडाचा इतिहास चांगला समजून घेतला होता, याचा उल्लेख करुन सुलेरी सुचवतात की, काही कडव्या मुस्लिमांनी देशत्याग केला व काहींचा कारस्थानी राजद्रोही म्हणून ब्रिटीशांनी बंदोबस्त केला. आणि उरलेले लोकशाही राष्ट्राच्या सापळ्यात अलगद अडकले म्हणजे भारतात मुस्लिमांचे राजकीय अस्तित्व राहिलेच कुठे?
सावरकर बंधूंच्या मते मात्र गांधींना मुस्लिमांचे कावे कळत नव्हते, इतिहास समजत नव्हता.
No comments:
Post a Comment