Wednesday, April 25, 2012

गांधी आणि मुस्लिम राजकारण

१. स्वातंत्र्यपूर्व भारतात मुस्लिम बहुसंख्येचे प्रांत होते आणि हे प्रांत भारताच्या मध्यवर्ती भागात नाही, तर फुटून वेगळे होऊ शकणा-या सीमावर्ती भागात होते.

२.. १९१६ ला लखनौ करार करुन कॉग्रेसने विभक्त मतदारसंघांना तत्त्व म्हणून मान्यता दिली. सगळे मुस्लिम राजकारण हे विभक्त मतदारसंघाच्या मागणीभोवती गुरफटलेले राजकारण आहे. विभक्त मतदारसंघामुळे लीग बळकट झाली, ती देशविभाजनाची मागणी करु शकली व या मागणीला तडीपर्यंत नेऊ शकली. पाकिस्तानची निर्मिती विभक्त मतदारसंघ मान्य केल्यामुळे अस्तित्वात आलेली आहे.

३. गोखले-टिळक मंडळींनी विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली होती. गांधींपुढे आलेला हा न निस्तरता येणारा वारसा होता. विभक्त/स्वतंत्र मतदारसंघातील मुसलमानांनी मुसलमान प्रतिनिधीसच निवडून द्यायचे व त्या मुसलमान प्रतिनिधीने फक्त मुसलमानांचेच हितसंबंध पहावयाचे
या सूत्रामुळे हिंदू-मुस्लिम वर्गातील दरी रुंदावत जाणार होती आणि तशी ती गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. "विभक्त मतदारसंघ आणि देशाचे ऐक्य या बाबी एकत्र नांदू शकत नाहीत" असे लाला लजपतरायांसारखे नेते स्पष्टपणे मांडू लागले.

४. लखनौ कराराच्या पुढे जाणारा एकही करार करण्यास गांधी तयार नव्हते. याउलट विभक्त मतदारसंघांना त्यांचा विरोध होता. कुरुंदकरांच्या भाषेत सांगायचे तर, "गांधींचे मुस्लिम विषयक धोरण हे की, मागे झाले ते झाले. यापुढे नवा करार नाही. आणि संधी मिळताच जे झाले ते मिटवून टाकावयाचे. राजकारणाच्या व्य्वहारात जे काही द्यायला तयार असतात ते खडख्डीत भाषेत इकडे मिळेल, तिकडे मिळणार नाही असे बोलतात व व्यवहारवादी ठरतात. जे काहीच द्यायला तयार नसतात ते नेहमी ’सगळे घरच तुमचे आहे’ अशा उदार भाषेत बोलतात, देत-घेत मात्र काहीच नाहीत! राजकीय व्यवहार म्हणुन उदार बोलणारे मात्र भोळसर ठरतात!!! गांधींनी भाषेच्या बाबतीत नेहमीच औदार्याची परिसीमा गाठली. शक्य त्या सर्व प्रकारांनी गांधीजी नेहमीच मुसलमानांना अनुकूल बोलत राहिले. गांधींची शेकडो विधाने याला साक्ष म्हणून उद्ध्रुत करता येतील. चार प्रांत मुस्लिम बहुसंख्येचे. मागच्या पिढ्यांनी विभक्त मतदारसंघ तोडून दिलेला. डोक्यावर परकीय राजसत्ता. या वातावरणात कोणताही देशाचा नेता फुटून पडू नये म्हणुन जसे बोलतो, तसे गांधीजी बोलले. मात्र त्यांनी कोणताही करार केला नाही."

१९२८ साली गांधींनी विभक्त मतदारसंघ मोडण्याचा प्रयत्न केला. १९२८ साली मोतीलाल नेहरु ह्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय "नेहरु रिपोर्ट" तयार करण्यात आला. स्वतंत्र भारताच्या संविधानाचे स्वरुप कसे असावे, हे ठरविण्यासाठी ही कमिटी नेमण्यात आलेली होती.. जवाहरलाल या कमिटीचे सेक्रेटरी होते. एकुण ९ सदस्य या कमिटीत होते. पैकी २ मुस्लिम होते.

नेहरु कमिटीने स्वतंत्र भारतात विभक्त मतदारसंघ नसतील हे जाहीर केले. मुस्लिमांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा देण्यास कमिटीची मान्यता होती. अर्थातच जीनांच्या लीगने ह्याला विरोध केला आणि विरोधात आपला चौदा कलमी कार्यक्रम जाहीर केला. मुसलमान विभक्त मतदारसंघांचा त्याग करणार नाहीत, प्रबळ केंद्र नसावे..सर्वच प्रांतांना सारखीच स्वायत्तता असावी, कायदेमंडळात मुस्लिमांना १/३ प्रतिनिधीत्व असायला हवे ... असे काही जीनांचे मुद्दे होते. हिंदू-मुस्लिम जातीय राजकारणाला चिथावणी देणारे हे राजकीय तत्वज्ञान होते. अर्थातच लीगने हा रिपोर्ट फेटाळला.

भारतातील भावी राज्यघटना कशी असावी, हिंदी कायदेमंडळात विविध जाती-जमातींना कसे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १९३०-३१ साली दोन गोलमेज परिषदा झाल्या. पहिल्या परिषदेवर कॉंग्रेसने बहिष्कार टाकला. या परिषदेत सैन्यदलात मुसलमानांना त्यांच्या संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी जीनांनी केली होतीच. दुस-या गोलमेज परिषदेत गांधींनी कॉंग्रेसतर्फे अल्पसंख्यांकविषयक आपली योजना सादर केली. यांत विभक्त मतदारसंघांना पुन्हा विरोध होता, मात्र अल्पसंख्यांकांना राखीव जागांची लोकसंख्येच्या प्रमाणात हमी देण्यात आलेली होती. या तरतुदी मुस्लिम नेत्यांना मान्य झाल्या नाहीत. याचवेळी भारताच्या एकतेची कल्पना म्हणजे मृगजळ आहे असे उद्गार जीनांनी काढले आहेत. या परिषदेत एकमत झाले नाही म्हणुन ब्रिटीशांनी आपला "जातीय निवाडा" जाहीर केला. या जाहिरनाम्यानुसार मुस्लिम नेत्यांच्या सर्व मागण्या ब्रिटीशांनी मान्य केल्या. सिंध अलग केला गेला, बलुचिस्तान आणि सरहद्द असे आणखी दोन मुस्लिम बहुसंख्यांक प्रांत निर्माण झाले, मुसलमानांना वेगळा मतदारसंघ दिला गेला, ते अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतांत त्यांना संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व देण्यात आले.

या दुस-या गोलमेज परिषदेत गांधीजींनी मुसलमानांच्या मध्यवर्ती कायदेमंडळातील ३३% प्रतिनिधीत्वाला विरोध केला तेव्हा लेडी मिन्टो त्यांना म्हणाल्या, "तुम्ही ३३ टक्क्यांना विरोध का करता? गोखले ४० टक्के द्यायला तयार होते." गांधीजी उत्तरले, "Gokhale was a big man. He could afford to commit big mistakes. I am too small, I can't do it." (लेडी मिंटो डायरी)

१९३५ चा फेडरल कायदा मग याच सुमारास जाहीर झाला. १९३७ ला प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका होतील हे जाहीर झाले. या निवडणुकीत लीगला केवळ ४.४  टक्के मत मिळाली. एकूण १५८५ जागांपैकी लीगला केवळ १०४ जागा मिळाल्या होत्या. मुस्लिम लीगचे हे प्रचंड अपयश होते. प्रांतिक सरकारांत स्थान न मिळाल्यामुळे लीगवाले चिडले. यानंतर मग क्र्माने जीनांनी कॉंग्रेस आणि हिंदूविरोधी प्रचार सुरु केला. कॉंग्रेस हिंदूंची आहे, कॉम्ग्रेसला हिंदी राष्ट्रभाषा करुन मुसलमानांची उर्दू नष्ट करायची आहे, वंदे मातरम इस्लामविरोधी आहे..असा जातीय प्रचार जीनांनी सुरु केला.

१९३५ च्या कायद्याने भारतात स्थापन होणारे संघराज्य मुसलमानांना घातक असल्याने ते रद्द व्हावे आणि मुसलमानांच्या हक्कांचे, संस्कृतीचे रक्षण करणारी नवी घट्ना तयार केली जावी, अशी मागणी लीगने केली. १९४० ला पाकिस्तान मागणारा प्रसिद्ध लाहोर ठराव मांडला.

५. खिलाफत चळवळीविषयी -
पहिली गोष्ट ही की, गांधींनी खिलाफत चळवळ सुरु केली नाही. चळवळ अलीबम्धूंनी सुरु केली. त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा मागितला आणि गांधीजींनी तो विनाशर्त दिला. गांधी व इतर नेत्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा न देता काय करायला हवे होते, असे हिंदुत्ववाद्यांना वाटते हे जरा त्यांनी स्पष्ट करावे.

गांधींनी पाठिंबा दिला नसता तरी खिलाफत चळवळ ही होणारच होती आणि मुसलमानांचा तिला प्रचंड प्रतिसाद मिळणारच होता. मुसलमानी कडव्या धर्मनिष्ठेची आणि हिंदूविरोधाची धार गांधीजींनी पाठिंबा दिला नसता तर कशी काय बोथट झाली असती हे कळणे कठिण आहे.
हिंदूंनी खिलाफतप्रकरणी मुसलमानी समाजाच्या भावनांशी सहयोगी होऊनदेखील खिलाफतीच्या आंदोलनात मलबार आणि सरहद्द प्रांतातील कोहाट येथे हिंदूविरोधी दंगे झालेच. मग गांधीजींनी आणि हिंदूंनी विरोध केला असता तर दंगे व्हायचे कसे काय टळले असते ? खूप ’आधुनिक’ समजल्या जाणा-या जीनांनी आणि त्यांच्या मुस्लिम लीगने कधी ह्या दंग्यांचा निषेध तरी केला होता?

गांधीजींनी पाठिंबा दिला नसता तर कदाचित तेव्हाच हिंदू-मुसलमान समाजात मोठी दरी निर्माण झाली असती. सर्व मुसलमान समाज कदाचित तेव्हाच मुस्लिम लीगच्या मागे गेला असता. मग पाकिस्तानच्या आकार आजच्याहून निश्चितच मोठा दिसला असता.

जीना आणि फाळणी

काही मंडळींना ’जिना उदारमतवादी, पुरोगामी होते पण गांधींच्या राजकारणामुळे ते जमातवादी झाले’ असा गैरसमज कुरवाळण्यात मोठी धन्यता वाटत असते. जिना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जमातवादीच होते. लखनौ कराराची कलमे पाहिली तर जीनांच्या    राष्ट्रवादाच्या कलमांची कल्पना येते. दोन जमाती समान सार्वभौम आहेत म्हणुन त्यांच्या समान सामुदायिक भागीदारीची राज्यव्यवस्था हवी असे थोडक्यात जीनांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेविषयी म्हणता येईल. कोणतेही कलम तीन चतुर्थांश मुस्लिम सभासदांच्या संमतीविना कायदेमंडळात मंजुर होणार नाही, हे कलम अल्पसंख्याक जमातीची बहुसंख्यांकांबरोबर राज्यकारभारात, सर्वच क्षेत्रांत समान भागीदारी प्रस्थापित करणारे होते. मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतांत मुसलमानांना संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व दिल्यावर हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतात तेथील हिंदूंनाही तसे दिले जाणे आवश्यक होते. पण तसे देण्याची तरतूद लखनौ करारात नव्हती. जीनांच्या तथाकथित उदारमतवादाची आणि भारतीय राष्ट्रवादाशी जुळवून घेण्याच्या तयारीची मजल येथपर्यंतच गेली होती.

हा करार झाल्यानंतर त्याच वर्षीच्या मुस्लिम मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरुन जीनांनी काढलेले उद्गार अर्थपूर्ण आहेत. मुसलमानांना त्यांचा वेगळा खलिफा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण आणि मुस्लिम लीगचे इतर पुढारी भारतीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहोत असाही त्यांनी या भाषणात दावा केला आहे. येथे जीनांच्या कल्पना स्पष्ट होतात. आपण मुसलमानांचे एकमेव नेते व्हावे अशी त्यांची आकांक्षा होती. आपल्याला मुसलमानात गोखल्यांसारखे स्थान प्राप्त व्हावे असे त्यांना वाटत असे. गोखले आणि टिळक यांच्या राजकीय वर्तनावर जीनांनी कधी टिका केलेली नाही.

गांधी नेहरुंवर टिका करतानादेखील गोखल्यांचा मोठेपणा ते दाखवीत नाहीत असे जीना म्हणत. जीनांनी हा फरक करण्याची कारणे स्पष्ट आहेत.

गोखले उदारतेने मुसलमानांना केंद्रात चाळीस टक्के प्रतिनिधीत्व द्यायला तयार झाले होते. टिळक वेगळा मतदारसंघ देत होते, मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतात संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व देत होते आणि मुख्य म्हणजे मुस्लिम लीगशी करार करुन ही संघटना मुसलमानांची प्रतिनिधी आहे आणि पर्यायाने कॉग्रेस ही हिंदूंची प्रतिनिधी आहे असे मान्य करत होते. "तुम्ही माझ्याशी टिळकांप्रमाणे बोलणी का करत नाही? ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणुन माझ्याशी बोलत होते." असे जीनांनी एकदा गांधी-नेहरुंना म्हटलेच होते. गांधीजी आणि नेहरु सर्वच जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत असे म्हणवून घेत होते अशी जिनांची खरी तक्रार होती. कॉंग्रेस हिंदू संघटना आहे, गांधी-नेहरु हिंदू आहेत, हे सगळे जीनांनी म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्याचा अर्थ कॉंग्रेस हिंदू संघटना राहावी आणि गांधी-नेहरुंनी हिंदूंचेच प्रतिनिधीत्व करावे असे जीनांना सुचवायचे होते. ते हिंदूंपुरता विचार करत नाहीत हा जीनांचा त्यांच्यावर राग होता. जीनांची या संदर्भातली जातीयवादाची(communalism) व्याख्या अजब होती. गांधी-नेहरु जातीयवादी विचार करत नाहीत म्हणुन ते जातीयवादी आहेत असे ते म्हणायचे.

हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये कधी जिनांनी मुस्लिमांना दोष दिल्याचे दाखवून द्यावे.

१९३१ साली आपल्याला राजकारणात पाहिजे तसे स्थान आणि महत्व्व मिळत नाही, हे पाहून जिनांनी कायमस्वरुपी इंग्लंडला जायचे ठरविले, तेव्हा त्यांना "मुस्लिम स्टुडंट्स युनियन" ने निरोपादाखल मेजवानी दिली. या प्रसंगी या राष्ट्रवादी मानल्या गेलेल्या नेत्याने जातीय भाषण केले. "भारताचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या स्वधर्मियांच्या भावना निर्लज्जपणे भडकावाण्याशिवाय जिनांनी आपला राजकीय वारसा म्हणुन अधिक काही चांगले मागे ठेवले नाही, ही मोठ्या दु:खाची गोष्ट आहे" असा न्या. छागलांचा अभिप्राय आहे. छागलांनी जिनांना हिंदू मुसलमानांचा एक संयुक्त पक्ष स्थापन करण्याची सूचना केली त्यावर जिना त्यांना म्हणाले, "तुम्ही ध्येयवादी आहात, उलट जी काही साधने उपलब्ध असतील, ती घेवुन मला काम करायचे आहे."  

Monday, April 16, 2012

फाळणी

फाळणी रोखायची असेल तर मुस्लिम बहुसंख्येच्या प्रांतांमध्ये निवडणुका जिंकाव्या लागतात ... आणि विभक्त मतदारसंघ ते करु देत नाही... तेव्हा विभक्त मतदारसंघ रद्द करुन घ्यावे लागतात. आणि तसं शक्य होत नसेल तर मुस्लिम लीगच्या ५० टक्केच्या भागीदारीच्या मागणीला मान्यता द्यावी लागते. ही किंमत चुकवायची तयारी नसते म्हणुन फाळणी होते. नुसतं पुण्या-मुंबईत अखंड भारताच्या नावाने भावनिक, टाळ्या पिटवणारी व्याख्यानं आणि बौद्धिकं घेवुन फाळणी टळत नाही!

----------

निवडणुकांनी हे सिद्ध केलं की, मुस्लिम बहुसंख्येच्या प्रांतांमध्ये
लीगच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहे आणि कॉंग्रेसच्या बाजूने
मुसलमान नाहीत... मुस्लिम लीगच्या मागण्यांना weightage आलं आणि या मागण्या
वाढत गेल्या. स्वतंत्र पाकिस्तानवादी झालेल्या या जनतेला कश्याच्या जोरावर
अखंड भारतात राहावेच लागेल असे सांगायचे ? हिंदू - मुस्लिम ही दोन वेगळी
राष्ट्रे आहेत हे मान्य करता तर हिंदूंना जशी स्वतंत्र भूमी हवीय, तशीच
मुस्लिमांना कशाच्या बेसिसवर नाकारायची?

कुणी कितीही नाकारले तरी
विभक्त मतदारसंघांमुळे फाळणी होणे शक्य झाले ही वस्तुस्थिती आहे. ह्यांत
टिळकांच्या माथी खापर फोडण्याचा संबंधच नाही, Its a fact!
पण काय आहे,
खिलाफतीला पाठिंबा देणारे गांधी बावळट, आणि विभक्त मतदारसंघ देणारे टिळक
मात्र धूर्त, मुत्सद्दी अशी काही मंडळींची विनाकारण भोळी समजुत असते... या
मंडळींनी हे ध्यानात घ्यावे की, खिलाफत चळवळीला टिळकांचा सुद्धा पाठिंबा होता.
नुसता टिळकांचाच नाही, तर तेव्हाच्या सर्व बड्या नेत्यांचा ( चित्तरंजन
दास, मोतीलाल नेहरु, लाला लजपतराय, तेजबहाद्दूर सप्रू इ.) पाठिंबा होता. या
सर्व मंडळींना मुस्लिम प्रश्नच कळला नाही, तो कळला फक्त आमच्या
नेत्यांना... अशी मनाची समजुत करुन घेतली म्हणजे मग इतरांना शिव्या घालणे
सोपे जाते.

खिलाफत चळवळीपूर्वी हिंदू-मुसलमान गुण्या-गोविंदाने राहत होते का ? खिलाफतीने मुसलमानांची आंतरराष्ट्रीय जाणीव वाढली ? मग आंबेडकर-मोरे या मंडळींनी १८५७ च्या उठावाला जिहाद का म्हटलंय ? तेव्हा आंतरराष्ट्रीय जाणीव नव्हती का ? मुस्लिम सत्ताधीश स्वत:ला तुर्क, पठाण, मंगोल असंच मानत नव्हते का ?

बाकी सिंध-बंगाल प्रांतात हिंदू महासभा कार्यरत होती हे
ठाउक आहेच.. त्याशिवाय का पाकिस्तानची मागणी सुरु असताना महासभा लीगसोबत
सरकारे चालवत होती ! 

Wednesday, April 4, 2012

गांधींचे राजकारण जिनावाद्यांच्या नजरेतुन



टिळकांचाच काय, पण सावरकरांपेक्षाही मुसलमानांना गांधींचाच धोका आणि पर्यायाने धाकसुद्धा अधिक असल्याचे ब-याच जीनावादी मुस्लिमांना वाटत होते, असे सांगितले, तर कित्येकांना आश्चर्य वाटेल..पण हे खरे आहे. सावरकर आणि त्यांचे समविचारी गांधींकडे मुस्लिमांचा अनुयय करणारा हिंदूहितविरोधक म्हणुन पाहत असले, तरी पाकिस्तानवादी मुस्लिम त्यांच्याकडे अगदी यांच्या उलट प्रकारे पाहत होते. झेड. ए. सुलेरी नामक जिनांच्या निकटवर्ती अनुयायाचे याबद्दलचे विवेचन प्रातिनिधीक मानायला हरकत नाही. सुलेरी "डॉन" ह्या वृत्तपत्राचे संपादक होते. सुलेरींचे "माय लीडर" हे पुस्तक या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.

सुलेरी आपल्या पुस्तकात जिनांचे गांधीविषयीचे मत उद्धुत करतात - "गांधींना समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि वास्तवाच्या अंतरंगांत खोलवर उतरावे लागेल."

सुलेरींनी अगदी सुरुवातीलाच गांधींबद्दलचे आपले मत स्पष्टपणे प्रकट केले आहे - [b]"एक व्यक्ती-एक मत असा अर्थ असलेल्या लोकशाहीच्या आवरणाखाली गांधी मुसलमानांच्या अस्तित्वावर सखोल प्रहार करण्याच्या निकटतम बिंदूपर्यंत येऊन ठाकले होते."[/b]

’गांधींनी भारतातील मुसलमानांची स्वतंत्र ओळख पुसून टाकून त्यांना गिळंकृत करुन टाकायची वेळ आणली होती; परंतु जिनांनी त्यांना वाचवले.’ असा सुलेरींच्या प्रतिपादनाचा रोख आहे. ’गांधी मुसलमानांचे निर्मुसलमानीकरण (deislamization) करु पाहात होते. ही योजना  जवळजवळ सिद्धीसही गेली होती,’ हे सुलेरी उदाहरणानेच सिद्ध करतात.

"ज्याच्या आयुष्यात माणसांच्या वर्गीकरणाच्या मुसलमान किंवा काफीर या दोनच कसोट्या होत्या, अशा बलाढ्य़ पठाणाला खादी आणि गांधी टोपी परिधान करताना आणि अहिंसेच्या संप्रदायाचे जलद गतीने ग्रहण करायला शिकताना पाहायचे. मुसलमानांच्या व्यक्तित्वात आणि स्वभावात असा धक्कादायक बदल पूर्वी कल्पनातीत होता. परंतु तसे प्रत्यक्षात घडले आणि त्याचे श्रेय पूर्णत: गांधींना द्यावे लागते."

जिनांनी गांधींच्या या महासंकटातून इस्लामला वाचवले म्हणून ’गांधी म्हणजे जिनांच्या यशाचे खरे मोजमाप होय’ असे सुलेरी म्हणतात; परंतु प्रारंभीच्या काळात मुसलमान ’गांधी गारुडा’ला इतके भाळले होते की, त्यांनी जिनांच्या इराद्याला जुमानले नाही, तेव्हा निराश होवून जिनांना काही काळ निवृत्त व्हायला लागले, असेही ते निदर्शनास आणून देतात.

सुलेरी ब्रिटीश काळातील मुस्लिमांच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतात. १८५७ च्या बंडात ब्रिटीशांना दुखावल्यामुळे ब्रिटीशांनी मुसलमानांना लक्ष्य केले असा त्यांचा युक्तिवाद आहे. मुस्लिमांचा हा -हास सर सय्यद अहमद खानांनी थोपवला. त्यांच्यामुळे मुस्लिम कॉंग्रेसच्या जाळ्यात सापडू शकले नाहीत. उलट आपल्या स्वतंत्र आणि समांतर अश्या राजकीय अस्तित्वाची जाणीव घेवुन त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली व आपल्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळविण्यात यश मिळविले. त्यांचे हे अस्तित्व कॉंग्रेसला मान्य करावे लागले. याचा पावतीवजा पुरावा म्हणजे सन १९१६ चा टिळक-जीना म्हणजेच कॉंग्रेस-मुस्लिम लीग लखनौ करार !

[b]परंतु मुस्लिमांनी प्रयासाने मिळवलेली ही राजकीय स्वायत्तता गांधींनी धुळीला मिळवली. ही किमया गांधी खिलाफतीच्या माध्यमातून करु शकले! मुस्लिमांच्या खिलाफतीला पाठींबा देवून गांधींनी त्यांना कॉग्रेसकडे नुसते वळवून घेतले, असे नाही, तर त्यांची प्रातिनिधीक राजकीय संस्था मुस्लिम लीग नामशेष करुन टाकली. यात गांधींचा हेतू मुसलमानांचे हिंदूकरण करण्याचा होता. गांधींनी सय्यद अहमदांच्या कामावर बोळा फिरवला.[/b]

गांधींनी ऐक्याचा आणि लोकशाहीचा सापळा लावून त्यात खिलाफतीचे आमिष ठेवले व मुस्लिम त्याला बळी पडू लागले, असा सुलेरींचा अन्वयार्थ आहे. लोकशाहीचा स्वीकार याचा मुस्लिमांसाठी परिणाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदू राज्याचा स्वीकार होय.

गांधींनी खिलाफतीचे निमित्त करुन मुस्लिमांना ब्रिटीशांविरुद्ध लढायची चिथावणी दिली. यात गांधी परस्पर ब्रिटीशांच्या हातून मुस्लिमांचा काटा काढू पाहत होते.

या संदर्भात सुलेरींनी केलेले इतिहासाचे वाचन बाबाराव सावरकरांच्या वाचनाच्या अगदी विरुद्ध होते. "अफगाण आमिराला भारतात पाचारण करुन गांधी ब्रिटीशांऐवजी मुस्लिमांची सत्ता स्थापायला निघालेले जयचंद असल्याचा" बाबारावांचा आणि इतर हिंदूत्वनिष्ठांचा आरोप होता. ही मंडळी गांधींचे जे उद्गार उद्ध्रुत करुन त्यांच्यावर हिंदूद्रोहाचा आरोप करतात, तेच उद्गार सुलेरी उद्ध्रुत करतात; पण त्यावरुन त्यांनी काढलेला निष्कर्ष अगदीच वेगळा आहे. हे उद्गार ४ मे १९२१ च्या ’यंग इंडिया’ मधील आहेत. गांधी लिहितात, "अफगाणिस्तानच्या अमिराने ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध युद्ध पुकारले, तर मी एका अर्थाने त्याला निश्चितच मदत करेन."

"सीमारेषेवरिल कोणत्याही आक्रमणाला थारा मिळणार नाही, इतके ब्रिटीश सैन्य सुसज्ज आहे" हे गांधींनी नुकतेच केलेले विधान उद्ध्रुत करुन सुलेरी सांगतात की, गांधींनी अमिराला दिलेले निमंत्रण हेच खरे नसून मुस्लिमांना दिलेली चिथावणी हीच खरी. अमिरामध्ये भारतावर आक्रमण करण्याचे सामर्थ्य नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते, त्यामुळे यात त्यांच्या मायभूमीला कोणताच धोका पोहोचणार नव्हता.

गांधींनी १८५७ च्या बंडाचा इतिहास चांगला समजून घेतला होता, याचा उल्लेख करुन सुलेरी सुचवतात की, काही कडव्या मुस्लिमांनी देशत्याग केला व काहींचा कारस्थानी राजद्रोही म्हणून ब्रिटीशांनी बंदोबस्त केला. आणि उरलेले लोकशाही राष्ट्राच्या सापळ्यात अलगद अडकले म्हणजे भारतात मुस्लिमांचे राजकीय अस्तित्व राहिलेच कुठे?

सावरकर बंधूंच्या मते मात्र गांधींना मुस्लिमांचे कावे कळत नव्हते, इतिहास समजत नव्हता.