आपल्या प्रस्तावित शिवचरित्राच्या प्रस्तावनेत थोर इतिहासकार प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी शिवाजी - रामदास संबंधी काही विवेचन केले आहे. ते पुढील प्रमाणे -
"
शिवाजीला आपले कार्य रामदासाच्या उपदेशानंतर सुचले असे नाही. याबाबत भोंगळ रामदासी लेखकांनी केलेला बोभाटा व्यर्थ आहे.दासबोधातले काही दशक शिवचरित्रांतील विशिष्ट प्रसंगांना उद्देश्युन लिहिले गेले, असे म्हाणण्याला स्पष्ट पुरावा ग्रंथांत कोठेही नाही. ओढूनताणून शब्दांचे अर्थ लावून याबाबत केलेला प्रयत्न खात्री पटविणारा नाही. रामदास व शिवाजी हे दोघेी पुरुष समर्थ व कर्तबगार होते. त्यांचा कालांतराने परस्परमित्रभावही जडला. पण त्याचा सुपरिणाम इतकाच की, शिवाजीच्या मनाला प्रपंचांतील क्लेशांपासून त्या़ची मुक्तता होऊन आंतरिक समाधान लाभले व संसाराच्या विचित्र रहाटीबद्दल त्याची समजुत पडून स्थितप्रज्ञाप्रमाणें शांत मनाने देहत्याग करण्याची तयारी त्याला करता आली.
या दोघांच्या संबंधांबाबत हनुमानस्वामींचे रामदासचरित्र भलत्याच काल्पनिक गोष्टी सांगते....पण त्यात विश्वसनीय भाग फारच थोडा दिसतो. त्याच्या आधारावर आधुनिक ब्राम्हणांनी शिवाजीच्या गुरुत्वाचे मोठेपण स्वत:च्या जातीला चिटकविणे ही तर भ्रमिष्टपणाची पराकोटी म्हटली पाहिजे. पण अश्या बालीश चाळ्यांत महाराष्ट्रातील शहाण्यासुरत्या लोकांनी तीन पिढ्य़ा कालापव्यय केला व लोकांना चुकीच्या मार्गावर हिंडविले, ही गोष्ट इतिहासात विसरता येण्यासारखी नाही. या हुल्लडीला इतिहासलेखक, तत्वज्ञानी, कादंबरीकार, निबंधकार, कवी सर्वच कमीजास्त प्रमाणात बळी पडले व समाजावर त्याचा मोठा अनिष्ट परिणाम घडला हे नमूद केले पाहिजे.
.....
....
रामदासांचे लिहिणें काही ठिकाणीं विचित्र, दुर्बोध, अर्थहीन आहे असे भासते. मागच्यापुढच्या ग्रंथाशी त्याचा संबंध दाखविता येत नाही. असे उतारे रामदासांनी शिवचरित्रातील विशिष्ट प्रसंगी लिहून शिवाजीकडे सूचना म्हणुन पाठविले, असे म्हणण्याला भक्तांना सवड होते व त्याचाच उपयोग करुन रामदास शिवाजींच्या काल्पनिक संबंधांची इमारत उभी करण्यात आली आहे. हनुमानस्वामींनी लगट करुन, ’सिऊबा’ सारखे घरगुती शब्द दोघांच्या संबंधांत योजून, त्यांची फार घसट होती, असा आभास उत्पन्न केला आहे. तोच कित्ता आधुनिक लेखकांनी गिरवून, शिवाजीचे सर्व चरित्र रामदासांनी आखल्याप्रमाणे चालले होते, अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदासांनी ठिकठिकाणी असंख्य मठ स्थापून शिवाजीच्या स्वारीचा रस्ता त्यांच्या अनुरोधाने ठरविला होता; तेच सर्व बातम्या काढीत व शिवाजीकडे कळवीत; निरोप इकडून तिकडे नेत, अशी रचना कादंबरीकारांनी व गोष्टीवेल्हाळांनी करुन इतिहासकाराचे काम स्वत:कडे खेचले आहे. त्यांना मदत म्हणुन अंध संशोधकांनी, रामदासांनी अखिल हिंदुस्थानची यात्रा बारा वर्षे केली; शेकडो मठ प्रांतोप्रांती स्थापिले; रामदासी उपदेशक सर्वत्र फैलाविले, अशा वार्ता अल्प आधारावर प्रदीर्घ प्रचलित केल्या आहेत. पण त्यांना अस्सल आधार. नि:शंक पुरावा थोडाच मिळाला आहे. बाकी सर्व इच्छापूर्तीचा व कल्पनेचा खेळ आहे. एवढा खटाटोप पन्नास वर्षे करुनही रामदासांच्या चरित्रांत स्पष्ट घडामोडींची भर पडू शकलेली नाही. तर्कावरच सर्व मदार ठेवण्यात आलेली आहे. ....
....
असेच सर्व आयुष्यभर चालून, रामदासांच्या शिष्यांमुळे शिवाजी आग्र्याहून सुरक्षित परत येतो; राज्याभिषेकाची युक्ती रामदासच त्याला सुचवितात; गागाभट्टासारखा महापंडित दासांपुढे लीन होतो, वगैरे वगैरे सांगणे क्रमप्राप्तच झाले. मात्र संभाजीच्या स्वेच्छाचाराविरुद्ध स्वामींना काही एक करता येत नाही. सज्जनगडाहून तो त्यांच्या दृष्टीसमोर मोगलांकडे पळून जातो., इत्यादी क्षुल्लक गोष्टी कोठे या चरित्रात येऊ द्यायच्या नाहीत एवढी काळजी घेतली म्हणजे झाले!
...
...
रामदासी पंथांत राजकारण अनस्युतच असते, तर ते इतिहासात कोठे ना कोठे दिसलेच असते. रामदास हे अनभवी, पुष्कळ पाहिलेले व ऐकिलेले शहाणे पुरुष होते.....पण स्वत:ची प्रत्येक गोष्ट समर्थांना सांगून मग शिवाजी आचरणात आणी, असे म्हणण्यास काहीही आधार नाही. फार कशाला, परमार्थाबाबतही शिवाजी याकूतबाबा किंवा मौनी महाराज यांना भेटला तो प्रथम रामदासांच्या कानावर ती गोष्ट घालून, असे कोणी मानील काय? ...
.. रामदासी पंथ खरोखरीच शिवाजीच्या कार्याला पोषक म्हणुन निघाला असता तर एका पिढीत त्याचे कार्य खलास झाले नसते. ते झाले याचा अर्थ तो हिंदुधर्म तारण्यासाठी काढलेला राजकारणी पंथ नव्हता हेच ठरते....अतएव रामदासी पंथाने काही ऐतिहासिक राजकीय कार्य महाराष्ट्रात घडवून आणले, हा प्रवाद युरोपच्या इतिहासाच्या वडाची साल पिंपळाला चिकटविण्याचा अव्यापारेषु व्यापार करणा-या काही इंग्रजीशिक्षित कल्पकांच्या मेंदूची विकृती आहे. खोट्या जात्याभिमानाने आत्मतुष्टी निर्माण करण्याचा तो एक खोडसाळ प्रयत्न आहे, असे गेल्या पाऊणशे वर्षांतील एतद्विषयक लिखाणावरुन ठरते.
....पेशवाईत रामदासी पंथाचा फारसा प्रसार झाल्याचे आढळत नाही. कोणीही पेशव्यांचे लक्ष समर्थांनी वेधून घेतल्याचे नमूद नाही. पेशव्यांच्या ग्रंथशाळेत दासबोधाच्या प्रतीची नोंद नाही. पेशवाईच्या अखेरीस रामदासस्वामींची बखर हनुमानस्वामींनी सजविल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या कौतुकास पुन: उजाळा मिळाला. सभासदाला आपल्या बखरीत रामदासांचे नावही कोठे आणण्याची जरुरी भासली नाही. यावरुन समकालीनांत शिवचरित्रावर दासांच्या कर्तृत्वाची विशेष छाप पडली होती, असे दिसून येत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी चिटणीसांनी आपल्या बखरीत रामदास आणिले. त्यांच्या आख्यायिकेस इंग्रजी इतिहासातही स्थान मिळाले. पण शिवचरित्रात रामदासांचा बोलबाला एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नव्याने पुढे आलेल्या इतिहास संशोधकांनी केला. रानड्यांच्या अंभूत भक्तिभावामुळे महाराष्ट्र संतांच्या कार्याला ऐतिहासिक अधिष्ठान लाभले. त्यातूनच संतांच्या कार्याची छाननी सुरु होऊन प्रार्थना समाज प्रभृती सुधारक पंथीयांनी तुकारामाचा उदो उदो आरंभिला. यांत ब्राम्हणांवर प्रच्छन्न टिका असल्यामुळे ब्राम्हणाभिमानी सनातन पक्षाने रामदासांनी पुढे आणिले व त्यांच्याकडे शिवकालीन, नव्हे शिवाजीच्या उदयाची मुख्य कामगिरी सोपविली.
नवे नवे कागद पुढे आणणारे व त्यांचा गूढार्थ बारकाईने सांगणारे इतिहास संशोधकच रामदासांची पाठ पुरविणारे झाल्यामुळे सामान्य वाचकांचा - आणि हे वाचक ब्राम्हणादी पांढरपेशे होते - सहजच समज असा होऊन बसला की, शिवाजीच्या कार्याची आखणी मुख्यत:समर्थांनी केली. राजवाड्यांसारख्या प्रतिभावान तिखट लेखकाने या मताचा पुरस्कार व प्रचार हाती घेतल्याने त्यांच्या भोळ्या भाबड्या भक्तांनी तोच क्रम उगाळण्याचे काम सर्वत्र चालू ठेविले. त्यामुळे हा समज जनमनात दृढ होऊन बसला आहे. पण मुळातच त्याला अस्सल आधार अत्यल्प असल्याने त्या पायावर एवढा मोठा इमला उभा करणे शक्य नाही.
.. ब्राम्हणांनी इतिहासाचा हा जो नवा डोलारा उभारिला त्याला मुळातच बिलकुल आधार नव्हता हे त्यांनी झाकून ठेविले आणि महाराष्ट्रातील सर्व वाङ्मयीन जगत त्यांच्याच सत्तेखाली असल्याने तसे करणे शक्य झाले. पुढे केळुसकरांसारखे साक्षेपी मराठे स्वत: बखरी वाचून पाहू लागले तेव्हा त्यास आढळले की, एकाही ऐतिहासिक बखरीत शिवाजीने रामदासांच्या झोळीत राज्य टाकल्याची कथा नाही ! अर्थातच त्यांच्या मते छत्रपती व शिवाजी यांचा संबंध परमार्थसाधनेपुरता उरला. पण हे म्हणणे इतिहास संशोधकास अमान्य. म्हणून त्यांनी त्या ग्रंथावरच वाळी घातली. म्हणजे केळुसकरांचे पुस्तक ब्राम्हणांत वाचले गेलेच नाही असे झाले. आणि ही प्रथा आजवर महाराष्ट्र वाङ्मयात चालू आहे.
"
संदर्भ - निवडक शेजवलकर, श्रीशिवछत्रपतींचे चरित्र- दोन उतारे, पृ. क्र. १७ ते ४३, साहित्य अकादमी