Friday, April 1, 2011

श्रद्धा या विषयावर दाभोलकर आणि अभ्यंकर यांची जुगलबंदी

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) ः ‘श्रद्धा’ या संवेदनशील विषयावर ‘विद्यावाचस्पती’ शंकर अभ्यंकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष ‘विवेकसाथी’ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज जोरदार जुगलबंदी झाली. आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या या वक्त्यांनी विविध उदाहरणे आणि दाखले देत बुद्धिप्रामाण्यवाद आणि आध्यात्म या विषयांवर केलेल्या प्रभावी वक्तव्यामुळे श्रोते थक्क झाले. या विचारांच्या लढाईत हार मात्र कोणी मानली नाही.
‘साधना’ साप्ताहिक आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या परिवर्तनवादी संस्थांनी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्या-त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना प्रोत्साहन दिले. आपला विषय मांडल्यानंतर दाभोलकर आणि अभ्यंकर यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले.
माणसाच्या संस्कृती, प्रगतीचा इतिहास म्हणजे श्रद्धा तपसाण्याचा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून पृथ्वी सूयाार्भोवती फिरते, असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला पाखंडी ठरवून एकान्तवासाची शिक्षा धर्मानेच दिली होती, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’
श्रद्धा आणि अंधश्रद्धेत १०० टक्के फरक आहे. सात्त्विक श्रद्धा हरविल्याने देशापुढे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कारण बुद्धिप्रामाण्यवादीच आहेत, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, ‘‘सगळ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या अलौकिक गोष्टींचा अनुभव प्रज्ञावंतांना आला. सर्व संतांनी श्रद्धेविषयी लेखन केले आहे. अशा प्रज्ञावंतांचे शब्दप्रामाण्य हाच ईश्वर असल्याचा पुरावा. तमोगुण, सत्त्वगुण आणि राजस गुण असलेली श्रद्धा असते. तमोगुण कमी होऊन जोवर सत्त्वगुण जागृत होत नाहीत, तोवर जगात शांतता लाभणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा, अशी आपली व्याख्या आहे. श्रद्धा जनसमुदायाची पकड घेते, असे सांगून दाभोलकर यांनी श्रद्धेला तपासणीचा न्याय लावला पाहिजे, असा आग्रह केला आणि विश्वास, अंधविश्वास यांचे सविस्तर विवेचन केले. मनुवादी व्यवस्था स्वीकारणार्‍या आणि वर्णव्यवस्था लादणार्‍या परंपरेने माणूस जन्मजात उच्च किंवा नीच असू शकतो, असे मानले आहे. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची कवचकुंडले असतात. श्रद्धेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असे ते म्हणाले.
काही गोष्टी श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. भावना हा श्रद्धेचा विषय नाही. सानेगुरुजींनीही गायत्री मंत्राचा जप केल्यास पुनर्जन्म लाभतो, असे म्हटले आहे. विज्ञान आणि आध्यात्म ही एकच आहेत. अणूपासून विश्वाची निर्मिती हे विज्ञानाने आता मान्य केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू संस्कृतीने पूर्वीच सांगितलेले आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी प्रमाण मानली, तर जगात गोंधळ उडाल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
वैज्ञानिक भाव बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. माझा विवेक हा बुद्धीचा निष्कर्ष आहे; तो देवाचा आदेश नाही, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘भावना माणसाची मालक आणि विचार नोकर असतात. कार्यकारणभाव हे माणसाचे मोठे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी परमेश्वर हेच सत्य, असे मानत. एका अनुभवाने ते सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.’’

From -

No comments:

Post a Comment