Friday, February 25, 2011

महात्मा फुले

१.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो?
ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो?
समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो?
शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो?
त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो?
समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो?
महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो?
- नीलकांत

२.

डावपेचात्मक ब्रिटिशप्रेम का न मानावे?


ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते.
सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले.
फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार?
तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.

३. महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्‍यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्‍या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती.
तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात.
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे.
अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते.
आपला,
(सविस्तर) आजानुकर्ण
एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.
-- आजानुकर्ण

============
महात्मा फुले यांच्याविषयी जेव्हा जेव्हा विषय चर्चेला येतो तेव्हा तेव्हा त्यांचे हिंदू धर्माबद्दलचे, देवतांबद्दलचे लिखान, इंग्रज सरकारविषयीचा दृष्टीकोण हे मुद्देही चर्चेला येतातच! नव्हे, ते यायलाच हवेत आणी सगळ्याच मुद्यांबाबत साधक-बाधक चर्चा व्हायला हवी. मला खात्री आहे की चर्चेअंती या थोर समाजसेवकाबद्दलचे यामुळे होणारे गैरसमज नक्कीच दूर होण्यासाठी मदत होईल.

मुळातच त्यांचे विचार वा लिखान समजावून घेताना त्याला आपण सध्याच्या परिस्थितीतील मोजपट्या लावणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल! उदाहरणच द्यायचे म्हणले तर सध्याच्या काळात दोन लग्ने करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. मात्र पुर्वी हा रिवाज समाजमान्य आणी प्रचलीत होता. मग आजच्या या बदलेल्या सामाजीक मुल्यावरुन पुर्वी एकापेक्षा अधीक लग्ने केलेल्या थोर इतिहास पुरुषांना आपण
असभ्य ठरवणार आहोत का? नक्कीच नाही! कारण तात्कालीन रिवाजाप्रमाणे (परिस्थितीप्रमाणे) त्यात काही वावगे नव्हते. अगदी हाच विचार फुलेंबाबतही प्रत्येकाने केला तर बर्‍याचशा गोष्टी चटकन स्वच्छ होतील. 
ब्रिटीश राजवट आणी म. फुले:
पहिल्यांदा त्यांच्या ब्रिटीश राजवटीविषयीबद्दल असणार्‍या आपुलकीविषयी बोलुयात.... वर उमेशच्या पोस्टप्रमाणे ब्रिटीशांनी रेल्वे, टपाल ई सेवा भारतात सुरु केल्या हे नेहमी सांगीतले जाते पण माझ्या मते तरी त्यांनी या सुविधा भारतीय लोकांसाठी नव्हे तर मुख्यत्वे त्यांचे राज्य सुरळीत चालावे म्हणून प्रशासकीय सुलभेतेसाठी केलेल्या होत्या. त्याबद्दल आपण अनुकंपा बाळगणे तेवढे योग्य होणार नाही. मात्र राजाराय मोहन रॉय सारख्या समाजसुधारकाला पाठींबा देऊन, सामाजीक विरोध डावलून कायद्याने सतीची प्रथा बंद करणे वगैरे सारख्या सामाजीक सुधारणा म्हणता येतील अशा ब्रिटीशांनी अमलात आणलेल्या गोष्टीही आपण नाकारु शकणार नाही हेही सत्य आहे.

तेव्हापर्यंत भारतीय समाजव्यवस्था ही धार्मीक पायावर उभी होती तर इंग्रज सरकारने धर्मविरहीत लिखीत कायदा आमलात आणला होता. हिंदू धर्मातील जातीभेद इतका टोकाला पोहचला होता की काही जातींना किमान माणुस असल्याची वागणूकही सवर्ण समाजाने नाकारली होती. मात्र ब्रिटीश कायद्यामध्ये या जतीभेदाला स्थान नव्हते. ज्योतीबांच्या समाजीक कार्याला ब्रिटीशांचा पाठींबा होता तर याउलट जातविरहीत समाजरचनेसाठी तळमळीने काम करणार्‍या फुलेंना सवर्ण व्यवस्थेकडून (पर्यायने भारतीय समाजव्यवस्थेकडून) प्रचंड विरोध पत्करावा लागत होता. अशा वेळी फुलेंचे मत ब्रिटीश राजवटीविषयी अनुकुल बनले असण्याची शक्यता न्याय्य ठरत नाही का?

शिवाय फुलेंचे जिवीतकार्य १८२७ ते १८९० पर्यंतचे आहे. त्या कालखंडात ब्रिटीशांविरुध्द सामाजीक लढा, संघर्ष अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. म्हणजे अशा स्वातंत्र्य संघर्षाला ज्योतीरावांनी विरोध करुन ब्रिटीशांबद्दल अनुकुल मत दिले आहे असेही नव्हे!
हिंदू धर्म आणी म. फुले:
फुलेंना अस्पृश्यता निवारण, मुलींचे शिक्षण अथवा काही सामाजीक अनिष्ट प्रथा दूर करताना कर्मठ आणी सनातनी लोकांचा धर्माच्या नावाखाली झालेला विरोध सर्वश्रूत आहे! मुळातच सवर्ण व्यवस्थेने केवळ आपले वर्चस्व रहावे म्हणून धर्माच्या नावाखाली कनिष्ठ जातींना वर्षानुवर्षे दिलेली अमानवी वागणूक ही अन्यायकारक होती. आपले दुर्दैव हे की हे सगळे हिंदू धर्माच्या नावाखाली चालवले गेले. अशा वेळी धर्मातील भेद मान्य करणार्‍या प्रथा बदलण्यासाठी ठाम नकार देणार्‍या वा त्याला विरोध करणार्‍या व्यवस्थेमुळे हिंदू धर्माबद्दलचे मत कलुषीत होणे नक्कीच शक्य आहे. (पुढील काळात त्याची परिणीती करोडो हिंदूंनी धर्माचा त्याग करुन बौध्द धर्माचा स्विकार करण्यात झाली हे सत्य सगळ्यांनी अनुभवले. पण तो येथे चर्चेचा विषय नाही).

हिंदू धर्मातील या अनिष्ट प्रथांवर टिका लिहीणे किंवा हा भेद देवालाही मान्य आहे अशा पसरविल्या गेलेल्या भ्रामक समजुतीवर आघात करताना देवतांबद्दल लिहीले जाणे आपणही मान्य करायला हवे. हा हिंदू धर्मावर वा देवतांवर हल्ला नसून भेदाभेद मान्य करणार्‍या, त्याचे समर्थन करणार्‍या प्रथांवर, घटकांवर केलेला हल्ला आहे हा भेद आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा! सध्याचे हिंदू धर्माचे स्वरुप हे खुप बदलेले, सुधारणावादी आहे म्हणून आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे. मात्र पुर्वी अशी परिस्थिती नव्हती हे खेदाने नमूद करावे लागते आहे. त्यामुळे तात्कालीन टिकेबद्दल आकस न ठेवता ते आघात आपण सध्या सकारात्मक दृष्टीने स्विकारणेच आपल्या धर्मासाठी, समाजासाठी हिताचे आहे. म. फुलेंची टिकाही आपण अशीच स्विकारावी असे माझे मत आहे.
भारतात पुर्वी मुस्लीम धर्माचा प्रसार तलवारीच्या जोरावर जसा झाला तसाच तो सुफी संतांच्या 'मुस्लीम धर्म हा जातीभेदविरहीत असून सर्वांना समान मानणारा आहे' या शिकवणुकीमुळेही झाला हे सत्य आपण जेवढे लवकर स्विकारु तेवढे आपल्यासाठी चांगले असेल. जात न मानणारा मुस्लीम धर्म अनेक कनिष्ठ जातीतील लोकांना जवळचा वाटला हे खरे आहे! फुलेंचे 'शिवाजीने मुस्लिम राज्य हाणून पाडले आणि नवीन हिंदू राज्य स्थापन केले वास्तविक पाहता याची काही गरज नव्हती' हे विधान या अनुषंगाने आले असावे असे मान्य करण्यास वाव आहे. त्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या इतर विधानांची कल्पना नाही आणी ते पुर्ण संदर्भासह वाचल्यावर त्याव्र लिहीणे योग्य ठरेल. मात्र एका सदस्याने आधीच त्यांचा शिवरायांबद्दलचा पोवाडा देऊन फुलेंचे शिवरायांबद्दलचे विचार कलुषीत नव्हते याचा दाखला दिलेला आहे.

सारांश.. आधीच म्हणल्याप्रमाणे फुलेंच्या विचारांकडे त्या काळच्या परिस्थितीचा विचार करुन पहायला हवे. अन्यथा तो या थोर समाजसुधारकावर अन्याय ठरेल!
 - अवधूत खरमाळे

No comments:

Post a Comment