.
सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.
रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.
कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.
सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.
रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.
सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.
विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.
सावरकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.
त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.
सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.
- भोचक
-------------
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय?
फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात.
जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते.
अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व.
सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व.
याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.)
त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.)
थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.)
- पंडित गागाभट्ट.
------------
(१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता.
त्यांच्या बर्याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.
हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....)
(२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे.
पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी.
अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.)
- इन्द्र्राज पवार