बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.
अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.
पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.
दुसर्या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.
पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेलासूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.
बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचंचंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.
पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दवया शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.
कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.